नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारत राबविणार आहे, असे मोदी यांनी नुकतेच सांगितले होते.
सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी पुण्याहून देशातील विविध ठिकाणांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. सध्या कोरोना लसीच्या ५४.७२ लाख डोसचा साठा केंद्र सरकारकडे असून, गुरुवारपर्यंत या डोसची संख्या १.६५ कोटीपर्यंत जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यातील १ कोटी १० लाख डोस सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’चे तर ५५ लाख डोस भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचे असणार आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणेच देशात आणखी काही कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आल्यानंतर केंद्र सरकार त्या लसींबाबत काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षणnकोरोना चाचणीच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्धा यांच्यासह ३ कोटी लोकांना प्राधान्याने लस देण्यात येईल. nत्यानंतर ५० वर्षे वयावरील व ५० वर्षे वयाखालील व्याधीग्रस्त लोकांना ही कोरोनाची लस दिली जाईल. लसीकरणासाठी काही हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. nदेशातील प्रत्येक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरण केंद्रे उभारली जातील.
देशात 16 हजारांहून कमी नवे रुग्ण
उपचाराधीन २.१४ टक्के; बरे झाले १ कोटी १ लाख
नवी दिल्ली : देशात दररोज आढळणारे नवे रुग्ण तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट सुरूच आहे. बुधवारी १५९६८ नवे रुग्ण आढळून आले. उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी होती व त्यांचे प्रमाण २.१४ टक्क्यांपर्यंत घटले आहे. १ कोटी १ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.५१ टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०४९५१४७ असून त्यातील १०१२९१११ जण बरे झाले आहेत, तर २१४५०७ जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक म्हणजे, १७८१७ एवढी होती. या दिवशी कोरोनामुळे आणखी २०२ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १५१५२९ एवढी झाली आहे.जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९ कोटी २० लाख असून, त्यातील ६ कोटी ५९ लाख लोक बरे झाले आहेत. २ कोटी ४१ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत २ कोटी ३३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १ कोटी ३८ लाख रुग्ण बरे झाले, तर ९१ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.