लखनौ - कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोनावरील लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर देशात कोरोनावरील लसीकरणाच्या तयारीला वेग आला आहे. कोरोनाच्या लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांत ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या लसीकरणाच्या ड्राय रनचा नियोजनातील चुकांमुळे बोऱ्या वाजल्याचे समोर आले आहे.उत्तर प्रदेशमध्ये मकर संक्रांतीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोणषा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. दरम्यान, लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून आज राज्यात ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वारणसीमध्ये कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन दरम्यान गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. एका ठिकाणी आरोग्य कर्मचारी कोरोनावरील लस चक्क सायकलवर घेऊन रुग्णालयात पोहोचले. लसीकरणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र लसीकरण केंद्रापर्यंत कोरोनाची लस पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच लस आल्यानंतर लसीकरण केंद्रातही पुरेशी व्यवस्था दिसून आली नाही.याबाबत विचारणा केली असता वाराणसीचे सीएमओ डॉ. व्ही.बी. सिंह यांनी सांगितले की, पाच केंद्रांमध्ये व्हॅनमधून लस पाठवण्यात आली आहे. केवळ महिला रुग्णालयामध्ये सायकलवरून व्हॅक्सिन आणण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात ६-६ ठिकाणी लसीकरणासाठी ड्राय रन आयोजित करण्यात आले आहेत. ड्राय रनदरम्यान कुणालाही लस दिली जात नाही आहे. तर ही केवळ लसीकरणाची रंगीत तालीम आहे.असे असले तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या व्यवस्थापनामध्ये अनेक उणिवा दिसून आल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतरही वाराणसीमध्ये अव्यवस्था दिसून आली. अनेक केंद्रांवर स्वयंसेवक उपस्थित नव्हते. एके ठिकाणी केवळ दोघेजण लस घेण्यासाठी पोहोचले. उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी १० ते १२ या वेळेत राज्यव्यापी ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते.
मोदींच्या मतदारसंघात कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनचा वाजला बोऱ्या, सायकलवरून आणली लस, स्वयंसेवकही गायब
By बाळकृष्ण परब | Published: January 05, 2021 3:48 PM
Corona vaccination Update : उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी १० ते १२ या वेळेत राज्यव्यापी ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ दिसून आला.
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या लसीकरणाच्या ड्राय रनचा नियोजनातील चुकांमुळे बोऱ्या वाजल्याचे समोर आलेपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वारणसीमध्ये कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन दरम्यान लस चक्क सायकलवरून रुग्णालयात आणली गेलीलसीकरणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र लसीकरण केंद्रापर्यंत कोरोनाची लस पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती