नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील लसीकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशभरात 2.5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती. पण, त्यानंतर हा लसीकरणाचा आकडा घसरला, यावरुनच राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केलीये.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर मागील दहा दिवसातील लसीकरणाचा ग्राफ शेअर केला आहे. या ग्राफमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावाढदिवशी म्हणजेच, 17 सप्टेंबर रोजी लसीकरणाची विक्रमी संख्या दिसत आहे, पण त्यानंतर ही संख्या झपाट्याने कमी झालेली दिसतीये. या ग्राफसोबत राहुल गांधींनी कॅप्शनमध्ये, ''इव्हेंट संपला'' असंही लिहीलं आहे.
मोदींच्या वाढदिवसाला विक्रमी लसीकरण
शुक्रवारी, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाली. 17 सप्टेंबर रोजी भारतात 2.50 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. कोविन पोर्टलवर उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील लसीकरणाचा एकूण आकडा 80 कोटींच्या पुढे गेला आहे.