नवी दिल्ली : ब्रिटन, युरोपीय समुदायातील अन्य देश, अमेरिका, जपान यांनी मान्यता दिलेल्या तसेच जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत समाविष्ट केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या भारतात मानवी चाचण्या करण्याची आवश्यकता आता उरलेली नाही. अशा चाचण्यांकरिता असलेली अट आता केंद्र सरकारने रद्द केली आहे. भारतामध्ये सध्या लसींची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.देशाचे औषध महानियंत्रक डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांनी बुधवारी ही घोषणा केली. कोणत्याही लसीच्या तिच्या वापराआधी संबंधित देशांत मानवी चाचण्या होत असतात. ही लस किती परिणामकारक आहे हे या चाचण्यांतून तपासले जाते. ब्रिजिंग ट्रायल्स अशीही संज्ञा असलेल्या मानवी चाचण्या आता विशिष्ट देशांनी या लसीला मान्यता दिली असेल तर भारतात बंधनकारक नाहीत. देशातील लसीकरण मोहिमेत सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक व्ही या तीन लसींचा वापर सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका मोठा होता की, त्यामुळे रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. तसेच लसींचा पुरवठाही कमी असल्याने त्याचा लसीकरण मोहिमेवर विपरित परिणाम झाला. अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे काही दिवस बंद ठेवावी लागल्याने नागरिकांचेही मोठे हाल झाले.
Corona Vaccination: देशात कोरोना लसींची टंचाई; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 6:19 AM