नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस देण्याचा ऐतिहासिक टप्पा गुरुवारी देशाने ओलांडला. अवघ्या दहा महिन्यांत भारताने ही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक डोस देण्यात आले असून, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो.देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असलेल्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डाॅ. राममनोहर लोहिया रुग्णालयात गेले. तेथील लसीकरण केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि लसीकरणाबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी या निमित्ताने देशभरातील सर्व डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेदेखील होते. आरोग्य कर्मचाऱ्यांचे आपण सारे कृतज्ञ १०० कोटी डोसचा टप्पा पार करून भारताने इतिहास रचला आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्याप्रति देशवासीय कृतज्ञ आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानअरुण राय १०० कोटींचे लसवंत!लसीचा १०० कोटीवा डोस डाॅ. लोहिया रुग्णालयात अरुण राय या दिव्यांग व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देण्यात आला. राय वाराणसीचे आहेत. ते म्हणाले की, या प्रसंगी मला मोदी यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अपंगांना दिव्यांग असे संबोधून तुम्ही त्यांना आदराने वागवत आहात असे मी मोदी यांना सांगितले.मोहिमेचे टप्पे१६ जानेवारी रोजी प्रारंभ. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना प्राधान्याने लस. २ फेब्रुवारीपासून कोरोना योद्धयांना लस देण्यास सुरूवात १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील लोक तसेच एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या व ४५ वर्षे वयापुढील लोकांचे लसीकरण १ एप्रिलपासून ४५ वर्षे वयावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय१ मे पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व लोकांचे लसीकरण सुरूभारताचे कौतुकभारतीय नागरिकांना १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रेस्युस यांनीही भारताचे अभिनंदन केले. या संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या संचालक डाॅ. पूनम खेत्रपाल सिंग यांनीही भारताचे तसेच देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
100 crore Corona Vaccination: 100 कोटींचा लस उत्सव; कोरोनाविरोधातील लढाईत देशाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 7:20 AM