नवी दिल्ली - कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीविरोधात भारताची लढाई सुरू आहे. आता देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक समुदायामध्ये त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी भारताकडे एक विश्वसनीय सहकारी म्हणून पाहिजे जाते, असे विधान केले होते. आता शेजारील देश तसेच इतर देशांना भारतामधून उद्यापासून कोरोनावरील लसींचा पुरवठा होणार आहे.इतर देशांना कोरोनावरील लसींचा पुरवठा करण्याची सुरुवात भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशपासून होणार आहे. भारत बुधवारी बांगलादेशला २० लाख लसींचे डोस पाठवणार आहे. हे डोस सीरम इन्स्टिट्युटने उत्पादन केलेल्या कोविशिल्डचे असतील. मिळालेल्या माहितीनुसार भारत हे डोस सद्भावना म्हणून पाठवणार आहे.त्यानंतर बांगलादेशला कोरोनावरील लसीचे डोस हे व्यावसायिक आधारावर दिले जातील. दरम्यान सीरम इन्स्टिट्युटकडून भारताला एक कोटी डोस मोफत देणार असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली असून, या लसिकरणासाठी सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी वापरल्या जात आहे.