नवी दिल्ली - अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. दरम्यान, या मोहिमेमध्ये आतापर्यंत देशातील ३४ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Corona Vaccination in India) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १८ ते ४४ वयोगटामधील सुमारे ९ कोटी ४१ लाख ३ हजार ९८५ जणांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर या वयोगटातील २२ लाख ७३ हजार ४७७ लोकांनी कोरोनावरील लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार ३४ कोटी ७६ हजार २३२ लोकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. तर सुमारे ४२ लाख लोकांना गेल्या २४ तासांत लस देण्यात आली आहे. (India's lead in corona vaccination surpasses US, vaccinating 340 million people so far)
आरोग्य मंत्रालाने सांगितले की, लसीकरण मोहिमेच्या १६७ व्या दिवशी १ जुलै रोजी ४२ लाख ६४ हजार १२३ लोकांना कोरोनावरील लस दिली गेली. ज्यामधील ३२ लाख ८० हजार ९९८ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला. तर ९ लाख ८३ हजार लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. तर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील २४ लाख ५१ हजार ५३९ लोकांनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला. तर ८९ हजार २७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. दरम्यान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील ५० लाखांहून अधिक लोकांना कोरोनावरील लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
ग्लोबल व्हॅक्सिन ट्रॅकरच्या ताजा आकडेवारीनुसार भारतामध्ये आतापर्यंत ३४ कोटी लोकांना कोरोनावरील लसीचा डोस मिळाला आहे. तर अमेरिकेमध्ये ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ लोकांचे लसीकरण झाले आहे. याआधारावर लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. कोरोना लसीकरणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर यूके आहे. येथे आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० जणांचे लसीकरण झाले आहे. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीमध्ये ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ जणांचे लसीकरण झाले आहे.
दरम्यान, भारतामध्ये कोरोनाला मात देण्यासाठी डिसेंबर २०२१ पर्यंत देशातील १०० कोटींहून अधिक लोकांना कोरोनावरील लस देण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. मात्र सध्याची लसीकरणाची गती आणि लसींची उपलब्धता यांचा विचार केला असता हे लक्ष्य साध्य होणे कठीण दिसत आहे.