नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,10,845 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,965 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,020 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूची माहिती मिळताच लसीसाठी रांगेत उभे असलेले लोक घाबरले आणि रांग सोडून घरी पळून गेले. महाराजगंजमधील लसीकरण केंद्रावर ही घटना घडली आहे.
मंगळावारी एका वृद्ध व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मितावा गावचे रहिवासी असलेल्या 65 वर्षीय़ जगन्नाथ पाल हे कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी विमला देवी या सुद्धा आल्या होत्या. पाल यांना लस घेतल्यानंतर अर्धा तास रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
लस घेतल्यानंतर विमला देवी आणि त्यांचे पती हे रुग्णालय परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळील झाडाखाली बसले होते. जवळपास अर्ध्या तासांनी जगन्नाथ पाल यांना चक्कर आली आणि त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात याची तातडीने माहिती देण्यात आली. मात्र डॉक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. विमला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ पाल हे लसीसाठी सकाळपासून रांगेत उभे होते. त्यानंतर कित्येक तासांनी त्यांचा नंबर लागला. मात्र लस घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
जगन्नाथ यांचे चुलत भाऊ उमानाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांची प्रकृती लस घेण्याआधी एकदम उत्तम होती. स्वत: सायकल चालवत ते लसीकरण केंद्रावर आले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून शवविच्छेदन रिपोर्टमधून नेमकं कारण समोर येईल असं म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.