यादगिर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही भागांमध्ये लसीकरणाबद्दल निरुत्साह दिसून येत आहे. काही ठिकाणी अफवांमुळे लोक लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे लसीकरण मोहीम राबवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. कर्नाटकच्या याडगिर जिल्ह्यात असाच प्रकार घडत असल्यानं इथल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थ लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. लसीकरण केंद्रांवर फारसं कोणी फिरकत नसल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाण्यास सुरुवात केली. मात्र अनेक जण कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दार लावून घेत आहेत. त्यामुळे आता लसीकरणासाठी अधिकाऱ्यांनी आता एक वेगळीच शक्कल लढवली आहे. कोरोना लसीबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे लोक लस घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे याडगिर जिल्ह्यात एक वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे.
'लस घेतल्यानंतर माणूस आजारी पडतो असे गैरसमज इथल्या लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे लोक लसीकरण करून घेत नाहीत. आम्ही लोकांच्या घरांपर्यंत गेलो. मात्र त्यानं दरवाजे लावून घेतले. त्यामुळे आता जिथे लोक दिसतील, तिथेच त्यांचं लसीकरण करायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे,' अशी माहिती जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी इंदुमती पाटील यांनी दिली.
'आम्ही मनरेगाच्या अंतर्गत नोंद असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली आहे. त्या माहितीचा आधार घेऊन आम्ही लोकांच्या कार्यस्थळी आणि शेतांमध्ये जाऊन त्यांचं लसीकरण करत आहोत. पोलिओ लसीकरण अभियानाच्या अंतर्गत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून जाऊन लसीकरण करण्याचा अनुभव आहे. त्यानुसार आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवली जात आहे,' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.