Corona Vaccination: लसीकरणाचा केरळ पॅटर्न, कमी लसींमध्ये केलं तब्बल लाखभऱ अधिक लोकांचं लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:10 PM2021-05-06T16:10:17+5:302021-05-06T16:16:19+5:30
Corona Vaccination in Kerala : देशात कोरोना लसींच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. दरम्यान केरळने कोरोना लसीकरणामध्ये एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
तिरुवनंतपुरम - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण भयानक पाकळीवर वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रासोबत कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. देशात कोरोना लसींच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत. दरम्यान केरळने कोरोना लसीकरणामध्ये एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. (Corona Vaccination in Kerala)
एककडे देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना लसींचे डोस मोठ्या प्रमाणात वाया जात असताना केरळमध्ये मात्र उपलब्ध लसींमध्ये मर्यादेपेक्षा सुमारे लाखभर अधिक लोकांचे लसीकरण करण्याची किमया येथील आरोग्य विभागाने साधली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार केरळला आतापर्यंत कोरोना लसीचे ७३ लाख ३८ हजार ८०६ डोस मिळाले आहेत. या डोसच्या माध्यमातून ७३ लाख २६ हजार १६४ जणांचे लसीकरण झाले आहे. म्हणजेच केरळमध्ये प्राप्त लसींपेक्षा ८८ हजार अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. या कामगिरीसाठी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमधील आरोग्य यंत्रणेचे विशेष कौतुक केले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पिनराई विजयन म्हणाले की, भारत सरकारकडून केरळला आतापर्यंत कोरोना लसीचे ७३ लाख ३८ हजार ८०६ डोस मिळाले आहेत. या डोसच्या माध्यमातून आम्ही ७३ लाख २६ हजार १६४ जणांचे लसीकरण केले आहे. लसीच्या प्रत्येक बाटलीमध्ये काही प्रमाणात असलेल्या अतिरिक्त डोसच्या माध्यमातून हे अतिरिक्त लसीकरण करण्याची किमया आमच्या आरोग्य विभागाने साधली आहे. आमचे आरोग्य कर्मचारी विशेष करून नर्सनी याबाबती कौतुकास्पद काम केले आहे.
Kerala has received 73,38,806 doses of vaccine from GoI. We've provided 74,26,164 doses, even making use of the extra dose available as wastage factor in each vial. Our health workers, especially nurses have been super efficient and deserve our wholehearted appreciation!
— Pinarayi Vijayan (@vijayanpinarayi) May 4, 2021
दरम्यान, केरळमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमामात धुमाकूळ घातला आहे. काल केरळमध्ये कोरोनाच्या ४० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमध्ये ८ ते १६ मे दरम्यान, कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
The entire State of Kerala will be under lockdown from 6am on 8 May to 16 May. This is in the background of a strong 2nd wave of #COVID19.
— Pinarayi Vijayan (@vijayanpinarayi) May 6, 2021