पणजी - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून भारतातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कोरोनाविरोधातील लसीकरण देशपातळीवर व्यापक प्रमाणात सुरू आहे. यादरम्यान, गोव्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के नागरिकांना कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आज स्वातंत्र्यदिनी जनतेला संबोधित करताना प्रमोद सावंत यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे देशातील पात्र वयोगटापैकी ९० टक्के लोकांचे लसीकरण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ( As many as 90% of the people in Goa, have been vaccinated, informed the Chief Minister Pramod Sawant on Independence Day)
कोरोना लसीकरण अभियानाचा हवाला देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यामध्ये लसीचे डोस घेण्यासाी पात्र वयामध्ये बसणाऱ्या संपूर्ण लोकसंख्येला पहिला डोस लवकरच देऊन पूर्ण होईल. मला ही घोषणा करताना आनंद होतो की ९० टक्के पात्र लोकसंख्येला पहिला डोस देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
कोविड-१० योद्धे आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या प्रयत्नांमुळे गोवा राज्य कोरोनाच्या साथीचा प्रभावीपणे सामना करण्यामध्ये यशस्वी ठरले आहे, असे प्रमोद सावंच यांनी सांगितले. दरम्यान गोवा सरकार आंतरराज्या म्हादई नदीच्या पाणी विवादावर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असेही प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील लोकांना पुढच्या महिन्यापासून दरमहा १६ हजार लिटर पाणी मोफत दिले जाईल. तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.