नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,132 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,50,782 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान वेगाने लसीकरण सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर 5 महिन्यांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
मृत व्यक्ती कोरोना लसीचा दुसरा डोस कसा घेऊ शकते हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्यक्तीच्या मुलाने या प्रकरणी थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ट्विट करून याबाबत सवाल विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघव नगर परिसरातील श्रीप्रकाश तिवारी हे एक सेवानिवृत्त अधिकारी होते. एप्रिलमध्ये त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर श्रीप्रकाश तिवारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची आणि भोंगळ कारभाराची चर्चा
मे मध्ये तिवारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूच्या पाच महिन्यांनी आता श्रीप्रकाश तिवारी यांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आला. त्यांच्या मुलाने मेसेज पाहिला असता त्यामध्ये तिवारी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचं म्हटलं आहे. यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत व्यक्तीला दुसरा डोस कसा दिला गेला असाच सवाल सर्वजण आता उपस्थित करत आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाची आणि भोंगळ कारभाराची चर्चा सुरू आहे.
"कोणीतरी त्यांच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलं असेल"
सीएमओ डॉ. आलोक पांडे यांनी कोणीतरी त्यांच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलं असेल. त्यामुळेच त्यांनी दुसरा डोस घेतला असा मेसेज आला असेल. पण सध्या जी चूक झाली आहे. त्याचा अधिक तपास करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. डिएम आशुतोष निरंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक गंभीर प्रकरण आहे. याचा तपास करण्यास सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.