मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. सध्या देशात लसीकरण अभियानात तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यात आता चौथ्या लसीची भर पडणार आहे. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीची लस याच आठवड्यात भारतात दाखल होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
जगभरात सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं कहर केला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. डेल्टा व्हेरिएंटविरोधात मॉडर्नाची लस प्रभावी आहे. क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात मॉडर्नाची लस ९४ टक्के परिणामकारक ठरली. मात्र कोवॅक्सिन, कोविशील्डच्या तुलनेत ही लस कमी तापमानात साठवावी लागते.
मॉडर्ना आणि फायझरची कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस कोरोनाचा धोका ८० टक्क्यांनी कमी करत असल्याची माहिती सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोलच्या (सीडीसी) संशोधनातून समोर आली आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यावर कोरोनाचा धोका ९० टक्क्यांनी कमी होतो. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात आणि सध्या फैलावत असलेल्या कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटविरोधात मॉडर्नाची लस प्रभावी असल्याची घोषणा गेल्याच आठवड्यात मंगळवारी कंपनीनं केली होती.
भारतीय औषध महानियंत्रकांनी गेल्याच महिन्यात मॉडर्ना लसीची आयात करण्यास परवानगी दिली. सिप्ला कंपनी मॉडर्नाची लस आयात करणार आहे. त्यामुळे देशाला कोरोना विरुद्धच्या लढ्यात चौथी लस मिळेल. कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लसीचा सध्या देशभरात वापर सुरू आहे. मॉडर्नानंतर फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसींनादेखील परवानगी मिळण्याची शक्यता आहे.