Gulabchand Katariya: राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केली गेलेली लसींची मागणी यावर राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असं वक्तव्य कटारिया यांनी केलं आहे. कटारिया यांच्या विधानावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला आहे. (corona vaccination in rajasthan gulab chand kataria controversial statement)
लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार लसीकरणाचं व्यवस्थापन करणं ही राज्याची जबाबदारी आहे. मे महिन्यापर्यंत राज्याला कोणताही अडचण नव्हती, जेव्हापासून केंद्रानं १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली तेव्हापासूनच राज्य सरकारला व्यवस्थेत बिघाड झाल्याचं दिसू लागलं आहे, अशी टीका गुलाबचंद कटारिया यांनी केली आहे.
"कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की ज्या केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल. केंद्राकडून देशातील विविध राज्यांना लसींचा पुरवठा केला जात आहे. जितकं उत्पादन सध्या होत आहे. त्याच प्रमाणात वितरण देखील होत आहे", असं कटारिया म्हणाले.
लस मग भाजपाच्या कार्यालयात दिली गेली की काँग्रेसच्या कार्यालयात. पण लस नागरिकांना मिळतेय ना? हेच महत्वाचं आहे. विविध सामाजिक संघटना पुढाकार घेऊन लसीकरण करत आहेत ही तर समाजाच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे नागरिकांचाच फायदा होत आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावरुन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वांरवार केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्राकडे जास्तीत जास्त लसीकरणाच्या पुरवठ्यासंदर्भात पत्र स्वरुपात मागणी देखील मुख्यमंत्री गहलोत यांनी केली आहे. तर भाजपाकडून सातत्यानं राज्यात लसीकरणाचं काँग्रेसीकरण केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे.