लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाची लस लोकांना ठरावीक वेळेत देण्याचे कोणतेही बंधन रुग्णालयांवर नाही. ती तिथे २४ तास उपलब्ध असायला हवी आणि लोकांना ती सोयीनुसार मिळायची व्यवस्थाही हवी, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सर्व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था करा, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी आता त्यापुढे जात ठरावीक वेळेतच ती देण्याचे कोणतेही बंधन रुग्णालयांवर नसल्याचे सांगितले. तसे प्रत्यक्ष सुरू झाल्यास लोकांना २४ तासांत कधीही सोयीने लस घेता येईल.लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारने वेळेचे बंधन काढून टाकले आहे. लोकांची वेळ आणि आरोग्य या दोन्ही बाबींना महत्त्व द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यामुळे मजूर, नोकरदार यांना त्यांच्या सोयीच्या वेळी लस मिळणे आवश्यक असून, रुग्णालयांनी तशी व्यवस्था करावी, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
पुरेसा साठा तयार ठेवा रुग्णालय व लस घेण्यासाठी येणारे यांचा विचार आम्ही केला आहे. त्यासाठी जे पोर्टल तयार करण्यात आले आहे, त्यात कुठेही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशा वेळेचे बंधन घातलेले नाही. सकाळी ८ किंवा त्याआधी ते रात्री ८ पर्यंत वा त्यानंतरही ती लस लोकांना मिळायला हवी. त्यासाठी रुग्णालयांनी राज्यांशी समन्वय साधावा आणि पुरेशा लसींची व्यवस्था करून ठेवावी, - डॉ. हर्षवर्धन