नवी दिल्ली - सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यापूर्वीच राज्यांकडून कोरोनाच्या लसीच्या टंचाईचा मुद्दा लावून धरण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan ) यांनी लसींच्या तुटवड्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (corona vaccination in India) देशातील विविध राज्यांना आतापर्यंत १६ कोटी लसी पुरवण्यात आल्या असून, त्यामधील १ कोटी डोस राज्यांकडे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. ("Is there a shortage of vaccines in the country?" No! States have one crore doses left, "Health minister Dr. Harsh Vardhan claimed)
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, राज्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर लसींचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत राज्यांना १६ कोटी डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामधील १५ कोटी लसींचा वापर झाला आहे. तर एक कोटी डोस शिल्लक आहेत. काही लाख डोस पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये उपलब्ध होतील. आतापर्यंत राज्यांना त्यांच्या क्षमतेनुसार लसीचा पुरवठा झाला नाही, असा एकही दिवस आलेला नाही.
यादरम्यान दिल्ली सरकारने सांगितले की, त्यांच्याजवळ कोरोनावरील लस उपलब्ध नाही आहे. तसेच ते खासगी कंपन्यांकडून पुरवठ्याची वाट पाहत आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, जेव्हा स्टॉक्स पुरेशा प्रमाणात उपलब्घ होईल तेव्हा जनतेला याची माहिती दिली जाईल. मात्र सध्या आमच्याकडे लस उपलब्ध नाही आहे. आम्ही कंपन्यांकडे पुरवठ्यासाठी विनंती केली आहे, असे जैन यांनी सांगितले.
लसनिर्मात्या कंपन्यांनी दिल्ली सरकारला लसीच्या पुरवठ्याचे वेळापत्र अद्याप सांगितलेले नाही. देशातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठीचे लसीकरण अवध्या एका दिवसावर आले असताना जैन यांनी ही माहिती दिली आहे.