नवी दिल्ली- कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना तीन महिन्यांनंतर कोरोनावरील लस देण्याच्या नॅशनल एक्स्पर्ट्स ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) ने केलेल्या शिफारशीला आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. (Corona vaccination) त्यामुळे आता कोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना कोरोनामुक्तीनंतर ९० दिवसांनी कोरोनावरील लस मिळणार आहे. (NEGVAC's recommendation approved by the Ministry of Health)
NEGVACने कोरोनावरील लस देण्याबाबत काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्यामध्ये जर कुणाला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशी व्यक्ती बरी झाल्यानंतर तिला कोरोनावरील लस देण्यात यावी, या महत्त्वपूर्ण सल्ल्याचा समावेश होता. त्याला आता आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर स्तनपान करवणाऱ्या मातांनाही कोरोनावरील लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच कोरोना लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची अँटिजन चाचणी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
या व्यक्तींना कोरोनावरील लस घेण्यासाठी पाहावी लागेल वाट
- ज्या व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना रिकव्हरीच्या तीन महिन्यांनंतर कोरोनाविरोधातील लसीचा डोस दिला जाईल- ज्या कोरोनाबाधितांना अँटिबॉडी आणि प्लाझ्मा दिला गेला आहे. त्यांनासुद्धा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनाच्या लसीचा डोस दिला जाईल- ज्या व्यक्तींना कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल. त्यांनाही कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोनाविरोधातील लसीचा दुसरा डोस दिला जाईल. - ज्या व्यक्ती कुठल्याही गंभीर आजाराने पीडित आहेत. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा आयसीयू केअरची गरज आहे. त्यांनासुद्धा चाते आठ आठवड्यांपर्यंत लसीसाठी वाट पाहावी लागेल. - गर्भवती महिलांना कोरोनावरील लस देण्यासाठीच्या नियमांबाबत विचार केला जात आहे. एनटीएजीआयकडून याबाबत पुढील माहिती दिली जाईल.