- विकास झाडेनवी दिल्ली : जगातील सगळ्यात मोठे लसीकरण, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाने सांगितले असले तरी देशात लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू असून, नागरिकांचे संपूर्ण लसीकरण होण्यास २०२३ उजाडणार आहे. मोदी यांनी ८८ मिनिटांच्या भाषणात कोरोना लसीकरणाबाबत भारत किती सरस ठरला हे सांगितले असले तरी अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारत खूप मागे आहे. देशातील असंख्य लसीकरण केंद्रे नियमित सुरू नाहीत. जिथे मोफत लसीकरण होते त्या शासकीय केंद्रात लस आलीच तर ती दुसऱ्या डोससाठी आणि ४५ वर्षे वयांवरील लोकांसाठी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच चित्र आहे. विदेशात लहान मुलांचे लसीकरण झाले. भारतात १२ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार होते. त्यालाही आता विलंब होत आहे.दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ पर्यंत देशभरात ५४ कोटी ५८ लाख ५७ हजार १०८ जणांना लस देण्यात आली आहे. यात पहिली डोस घेणारे ४२ कोटी ८० लाख, तर दुसरा डोस घेणारे बारा कोटी १७ लाख आहेत. देशाला पुन्हा २१५ कोटी डोसची गरज आहे. केंद्र सरकारने डिसेंबर २०२१पर्यंत देशातील प्रत्येकाचे लसीकरण होईल असे सांगितले होते. त्यानुसार देशात दररोज दीड कोटी लोकांचे लसीकरण व्हायला पाहिजे. परंतु, प्रत्यक्षात होतात सरासरी ५० लाख. जागतिक आरोग्य संघटनेने आणखीन एका नवीन व्हायरसचा इशारा दिला आहे. वटवाघळामुळे ‘मरबर्ग’ हा नवीन आजार पसरत असून, हादेखील जीवघेणा आजार आहे.
९५ देशांना पुरवल्या लसी! देशासमोर कोरोनाचे खूप मोठे आव्हान असताना मोदी सरकारने २१ जानेवारी ते १६ एप्रिल २०२१ या ८५ दिवसांमध्ये जगातील ९५ देशांना ६ कोटी ६३ लाख ७० हजार लसी पुरवल्यात. त्या उपक्रमाला ‘व्हॅक्सिन मैत्री’ असे नाव देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक बांगला देशला ३३ लाख डोस अनुदानित स्वरूपात दिले आहेत. त्यानंतर म्यानमार १७ लाख, नेपाळ ११ लाख, भूतान ५.५ लाख, मालदीव दोन लाख तसेच मॉरिशसला एक लाख लसींचे डोस अनुदान स्वरूपात दिलेत. व्यावसायिकतेच्या अनुषंगाने बांगलादेशला ७० लाख डोस पुरविण्यात आले आहेत. म्यानमार २० लाख, नेपाळ १० लाख, मालदीव १ लाख आणि मॉरिशसला ३ लाख डोस पुरवले. याशिवाय श्रीलंका, ब्राझील, ओमान, मिस्त्र, अल्जीरिया, दक्षिण आफ्रिका, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान, अर्जेंटिना, घाना, नायजेरिया, कंबोडिया, सीरिया आदी देशांना लस पुरविण्यात आली.
१२ ऑगस्ट४४ लाख १९ हजार ६२७ १३ ऑगस्ट५७ लाख ३१ हजार ५७४ १४ ऑगस्ट६३ लाख ८० हजार ९३७ १५ ऑगस्ट७३ लाख ५० हजार ५५३ १६ ऑगस्ट१७ लाख ४३ हजार ११४