- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्यांची संख्या सतत कमी होत आहे. तरीही विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांच्या तुलनेत राज्यात सोमवारी सकाळी परिस्थिती चांगली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरही विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत कोरोना लसीकरणाचे काम अचानक थंडावले. आसाममध्ये एक एप्रिलऐवजी ११ एप्रिलला फक्त २८ टक्के लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. पश्चिम बंगालमध्ये लस घेणाऱ्यांचे प्रमाण घटून ४५ टक्के, तामिळनाडूत ५३, तर केरळमध्ये ७४ टक्के नाेंदले गेले. पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशात लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या एक एप्रिलच्या तुलनेत तीन पट होती. महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या ५४५४६१४ लाखांवरून वाढून ९२२०६१० झाली; परंतु पाच एप्रिलनंतर रोज ही संख्या कमी होत आहे. त्या दिवशी ४.१८ लाख लोक लसीकरणात सहभागी होते. दुसऱ्या दिवशी ४.१० लाख, ८ एप्रिलला ३.५९ लाख आणि १० एप्रिल रोजी २.६७ लाखांपेक्षा जास्त लोकांना पहिली मात्रा दिली गेली. ११ एप्रिल रोजी ही संख्या २.५० लाखांवर गेली. गेल्या १२ दिवसांत दोन एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक ४.९८ लाख लोकांना लसीकरणात समाविष्ट केले गेले होते.
अमेरिका, भारत, ब्राझीलमध्येे रुग्णांची वाढ सुरूच नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी १९ लाखांवर पोहोचली असून, आतापर्यंत पावणेसहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्ण १ कोटी ३५ लाखांवर पोहोचले आहेत. ब्राझीलमधील रुग्णसंख्या १ कोटी ३४ लाखांवर पोहोचली आहे. साडेतीन लाखांवर मृत्यू झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या १२ लाखांवर आहे. फ्रान्स, रशिया, इंग्लंडमधील रुग्णसंख्या चार ते पाच लाखांपर्यंत आहे. या तीनही देशांत ९८ हजार ते एक लाखांवर मृत्यू झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या पावणेतीन लाख ते चार लाख आहे. तुर्की, इटली, स्पेन, जर्मनीमधील रुग्णसंख्या तीन ते पावणेचार लाख आहे. तुर्की, इटलीत पावणेपाच ते सव्वापाच लाखांपर्यंत सक्रिय रुग्ण आहेत. स्पेनमध्ये पावणेदोन लाख तर जर्मनीत सक्रिय रुग्ण पावणेतीन लाख आहेत. इराणमधील रुग्ण २० लाखांवर पोहचले आहेत. सक्रिय रुग्ण तीन लाखांवर आहेत. द. आफ्रिकेतील रुग्णसंख्या १५ लाखांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्ण २१,८४० आहेत. स्वीत्झर्लंडमधील रुग्ण ६ लाखांवर पोहचले आहेत. सक्रिय रुग्ण ५२ हजारांवर आहेत. जपानमधील रुग्णसंख्या ५ लाखांवर पोहचली आहे. सक्रिय रुग्ण ३० हजारांवर आहेत. यूएईमधील रुग्णसंख्या ४ लाख ८५ हजार झाली आहे. सक्रिय रुग्ण १३ हजारांवर आहेत. सौदी अरेबियातील रुग्णसंख्या ३ लाख ९८ हजारांवर आहे. सक्रिय रुग्ण ८ हजारांवर आहेत.
नेपाळमधील रुग्ण २ लाख ८० हजारांवर असून, सक्रिय रुग्ण तीन हजारांवर आहेत. श्रीलंकेतील रुग्णसंख्या ९५ हजारांवर पोहचली असून, सक्रिय रुग्ण २९०२ आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचे २० नवे रुग्ण आढळले असून, लस घेतलेल्या एका भारतीय नागरिकासही संसर्ग झाला आहे.
.........