लखनौ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. आता ही लाट ओसरत असली तरी या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील बीरपूर गावामध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. या गावातील अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र असे असूनही ग्रामस्थ कोरोनावरील लस घेण्यास नकार देत आहेत. (Corona vaccination in India) लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक आले असता या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. दरम्यान, ग्रामस्थांनी लस घेण्यास नकार दिल्याने नाराज होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावाचा वीजपुरवठाच कापल्याचा आरोप केला जात आहे. मात्र केवळ थकीत वीजबिल असलेल्यांचाच वीजपुरवठा कापण्यात आल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. तरीही लस न घेतल्यानेच वीज कापण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ( Villagers refuse corona vaccine, SDM cuts off village electricity; Ration also stopped)
बीरपूर गावामध्ये बुधवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी कँम्प लावण्यात आला होता. त्यासाठी सकाळी १० वाजता आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले होते. मात्र ग्रामस्थ लस घेण्यासाठी येतच नव्हते. त्यानंतर या पथकाने घरोघरी जाऊन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगण्यात आले. तेव्हा येथील एसडीएम देवेश गुप्ता यांच्यासह प्रभारी आरोग्य अधिकारी राम मिलन सिंह.परिहार, एडीओ पंचायत अरविंद राजपूत दाखल झाले. अधिकाऱ्यांनीसुद्धा घरोघरी जाऊन लोकांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्यांनाही धुडकावून लावले. त्यामुळे एसडीएमनी बीरपूर मधील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. तसेच गावातील रेशन पुरवठाही रोखला.
दरम्यान, ग्रामस्थांनी लस न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर अधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. एडीएम गजेंद्र कुमार यांनी सांगितले की, ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण कँम्प लावण्यात आला होता. एसडीएम तिथे गेले असता ग्रामस्थ लसीकरणाबाबत नकारात्मक दिसत होते. ते लसीकरणाला विरोध करत होते. एसडीएम यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकले नाहीत. तसेच लस न घेतल्याने वीज कापण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. केवळ वीजबिल थकीत असलेल्यांचाच वीजपुरवठा कापण्यात आला आहे.