नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गाचा सामना केल्यानंतर आता भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. मात्र कोरोना लसीबाबत प्रसारित होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे ही लस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सोशल मीडिया तसेच काही नेत्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री कोरोनाची लस कधी घेणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.आज तक या वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनावरील लसीसाठी शास्त्रज्ञांना वेळोवेळी प्रोत्साहित करत आहेत. आता कोरोनाची लस घेण्याबाबत म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे कोविड-१९ विरोधातील लढ्यामधील आमच्या फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण होईल आणि ५० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी आम्ही राजकीय क्षेत्रा वावरत असलेले लोकही कोरोनावरील लस घेऊ, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.यावेळी जनतेच्या मनात विश्वास वाढवण्यासाठी इतर देशातील नेत्यांप्रमाणेच आपल्या देशातही नेत्यांनी लस घेतली पाहिजे होती का, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, इतर देशातील लोकांप्रमाणे आपल्या देशातील जनता विचार करेल असं मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. मला वाटते की देशातील जनतेचा या लोकांवर विश्वास आहे. तसेच आम्हीही जनतेला विश्वास देत आहोत. दरम्यान, कोविड-१९ च्या आव्हानाचा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे केला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.दरम्यान, आज लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरात एक लाख ९१ हजार १८१ जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच आतापर्यंत लस दिलेल्यांपैकी कुणावरही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.