नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी मोठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोना लसीसाठी महिलांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. तसेच रुग्णालयात जोरदार हाणामारी देखील पाहायला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये कोरोना लसीसाठी (Corona Vaccination) काही महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या. रुग्णालयातच त्या एकमेकींना भिडल्या असून एकमेकींचे केस ओढले आहेत. सोशल मीडयावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना लसीसाठी महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. छपरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना आहे. एकमा रुग्णालयामध्ये महिला कोरोना लस घेण्यासाठी गेल्या होत्या. लसीसाठी महिलांची रांग लागली होती. या रांगेवरूनच महिलांमध्ये सुरुवातीला थोडा वाद सुरू झाला. पुढे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.
लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणीच चार महिला आपापसात भिडल्या. महिलांनी एकमेकींचे केस ओढले. एकमेकींना जमिनीवर आपटलं. हाणामारीचा हा व्हिडीओ तुफान फायरल झाला आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी बिहारमधील गोपाळगंजच्या आंबेडकर भवनमध्ये कोरोना लसीसाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रावर लोकांनी लसीसाठी एकमेकांना धक्काबुक्की केली. मारहाण देखील करण्यात आली. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र लोक ऐकून घेत नसल्याने त्यांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. कोरोना लसीकरण केंद्रावर झालेली मोठी गर्दी आणि गोंधळ पाहून आरोग्य कर्मचारीच पळून गेल्याची घटना समोर आली होती.
मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक
सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.