नवी दिल्ली: देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यानिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले की, '75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन. आमची लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा अभिमान आहे.'
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी ट्विट केले की, 'भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करताना, देशातील 75 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला कोविड-19 विरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे. 'सबका साथ, सबका प्रयास' या मंत्राने, भारताने आपल्या 75% प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत. आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि लवकरात लवकर लस घ्यावी.'
लसीकरण मोहिम वेगाने सुरूकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 164.36 कोटीहून अधिक लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याशिवाय, 12.43 कोटींहून अधिक उर्वरित आणि न वापरलेले लसीचे डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही उपलब्ध आहेत. देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाली होती.