जींद: कोरोनाची दुसरी लाट भयावह होत चालली असून, कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला आहे. देशभरात ३ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. अपुऱ्या लसींमुळे अनेक ठिकाणचे लसीकरण बंद झाले आहे. त्यातच आता कोरोना लस चोरण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (corona vaccine 1710 doses including 1270 of covishield and 440 of Covaxin stolen in haryana)
हरियाणामधील जींद येथील सिव्हिल रुग्णालयात ही घटना घडली असून, गुरुवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली. आरोग्य निरीक्षक राममेहर वर्मा सकाळी कार्यालयात पोहोचले असता, त्यांना कोरोना लसींची चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ याची माहिती संबंधित अधिकारी आणि पोलिसांना दिली.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस चोरले
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसींचे एकूण १७१० डोस चोरीला गेले आहेत. यापैकी १२७० कोव्हिशिल्ड आणि ४४० कोव्हॅक्सिनच्या डोसचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात पोहोचले, तेव्हा पीपी सेंटरचे कुलूप तुटलेले आढळले. यानंतर आत जाऊन पाहिले, तेव्हा स्टोअर रुमचे कुलूपही तोडण्यात आल्याचे आढळून आले. कोरोना लसींची तपासणी केल्यावर लसींचे डोस चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. मात्र, सेंटरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपये सुरक्षित असल्याचे समजते.
महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न
रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
हरियाणामधील जींद येथे असलेल्या सिव्हिल रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रुग्णालयात कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आला असून, दिवस-रात्र कर्मचारी ड्युटीवर असतात. याशिवाय सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले आहेत. तरीही अशा प्रकारे कोरोना लसींची चोरी कशी झाली, असा सवाल विचारण्यात येत आहे. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असून, पुढील तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.