नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणाचे वाढते प्रमाण यामुळे भारतात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात लसींच्या तुटवड्यामुळे कोरोनाविरोधातील लसीकरण बंद ठेवावे लागले होते. (Corona vaccination in India) मात्र आता संपूर्ण देशवासियांना काहीसा दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून कोरोनाविरोधातील लसीकरण सुरू असताना आता केंद्र सरकारने कोरोनाविरोधात अजून एका लसीला मान्यता दिली आहे. (India gets third corona vaccine, Sputnik-V gets central Government's approval)
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या संकेतांप्रमाणे रशियात विकसित झालेल्या स्पुटनिक-V या लसीला भारतात मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर देशाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी तिसरी लस उपलब्ध झाली आहे. आता या लसीच्या माध्यमातून भारतात लवकरच लसीकरणास सुरुवात होऊ शकते. भारतामध्ये हैदराबादमधील डॉ. रेड्डी ही औषधनिर्माता कंपनी स्पुटनिक-V या लसीचे उत्पादन घेत आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने स्पुटनिक- V बाबत डॉ. रेड्डी कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत या लसीचा आपातकालिन वापरास परवानगी दिली.
स्पुटनिक-V या लसीला मान्यता देण्यात आली असली तरी या लसीची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. परदेशात ही लस १० डॉलरपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. डॉ. रेड्डी लॅब ही कंपनी सुरुवातीला ही लस रशियामधून आयात करणार आहे. त्यामुळे तिची किंमत अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र एकदा भारतात उत्पादन सुरू झाल्यावर तिची किंमत खूप कमी होईल. डॉ. रेड्डी लॅबसोबत १० कोटी डोससाठी करार झाला आहे.
सध्या देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण सापडले आहेत. तर ७५ हजार ८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.