नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 33,478,419 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,256 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 295 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या एका नेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 5 वेळा कोरोना डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लसीचे पाच डोस दिलेले असले तरी आता सहावा डोस शेड्यूल असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात ही हैराण करणारी घटना घडली आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामपाल सिंह हे बूथ क्रमांक 79 चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचं लिहिलं आहे. रामपाल सिंह यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
रामपाल सिंह कोरोना लसीचा पहिला डोस 16 मार्च रोजी आणि दुसरा 8 मे 2021 रोजी घेतला होता. मात्र जेव्हा त्यांनी अधिकृत पोर्टलवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले, तेव्हा त्यामध्ये लसीचे पाच डोस पूर्ण झाले असून सहावा डोस डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान शेड्यूल असल्याचे दिसून आलं आहे. प्रमाणपत्रावर पहिला डोस 16 मार्च आणि दुसरा डोस 8 मे रोजी दाखवतंय. तर, तिसरा डोस 15 मे आणि चौथा-पाचवा डोस 15 सप्टेंबरला घेतल्याचं दिसतं आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अखिलेश मोहन यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लसीसाठी कोणाकडून दोनपेक्षा जास्त वेळा नोंदणी झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
प्रथमदर्शनी हा गैरप्रकार आणि षड्यंत्र वाटत आहे. काही लोकांनी पोर्टल हॅक करून हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असल्यातची माहिती अखिलेश मोहन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना तपासणी केंद्रावर मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निष्काळजीपणाचा कळस! कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट; अर्ध्या तासात तडफडून मृत्यू
महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्यातरी आजारामुळे मृत्यू झाला असेल असं म्हटलं आहे. या घटनेने गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. राम बहाद्दूर दास यांची 65 वर्षीय पत्नी जासो देवी यांचा मृत्यू झाला आहे. राम बहाद्दूर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कोरोना लस घेण्यासाठी गेली होती. मात्र लस घेण्याआधी तिला कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकून राहीलं. जासो देवी यांना यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. यानंतर तातडीने डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली.