नवी दिल्ली: भारत मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे. आता लवकरच या मोहिमेअंतर्गत देशात 100 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. CoWIN वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 96.75 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यानुसार, लसीकरणाचा आकडा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत 100 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. दसरा सणामुळे उद्या लसीकरणाचा वेग मंदावू शकतो. पण, सरकार दसऱ्यानंतर लवकरात लवकर 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करेल.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेगा आउटरीच योजनेअंतर्गत भाजपने आपले मंत्री, खासदार, आमदार आणि राष्ट्रीय आणि राज्य कार्यकर्त्यांना देशभरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार या योजनेतून पुढील वर्षी निवडणुका होणाऱ्या राज्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे उत्तर प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात आणि पंजाब असेल. योजनेअंतर्गत मंत्री आणि खासदारांसह भाजप नेते लसीकरण केंद्रांना भेट देतील. तिथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल.
लसीचा कमी पुरवठा आणि CoWIN मध्ये गडबड झाल्यामुळे सुरुवातीच्या व्यत्ययानंतर, केंद्राने कोविड लसीकरणाचे धोरण बदलले. त्यानंतर लसीकरणाला गती मिळाली. बदलाचा एक भाग म्हणून, केंद्राने राज्यांकडून लसीकरणाचे नियंत्रण मागे घेतले आणि 18 वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लसीकरण जाहीर केले. कोविनच्या आकडेवारीनुसार, देशातील 27.57 कोटीहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत आणि 69 कोटीहून अधिक लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे.