नवी दिल्ली : जगातील ९६ देशांनी आपापसात एकमेकांच्या कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे भारतातील लस घेतलेल्यांना या ९६ देशांत जाणे सुलभ होणार आहे. तसेच या ९६ देशांतील लोक भारतात तसेच आपापसात प्रवास करू शकतील. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, जगातील अन्य देशांनीही एकमेकांच्या तसेच भारताच्या लस प्रमाणपत्राला मान्यता द्यावी, यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. या प्रमाणपत्राला मान्यता मिळाल्यास शिक्षण, व्यवसाय, रोजगार. पर्यटन यासाठी प्रवास करू इच्छिणाऱ्या लोकाची खूपच मोठी सोय होणार आहे. भारताचे प्रमाणपत्र आता ९६ देशांमध्ये चालणार आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ज्या लसीला परवानगी दिली आहे, त्याच लसीचे प्रमाणपत्र अन्य देशांत जाण्यासाठी चालेल.
कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना या ९६ देशांमध्ये जाता येईल. कोवॅक्सिनबाबतही तशी मान्यता सर्व देशांनी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोवॅक्सिनला दोनच दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. ती मिळाल्याने ती लस घेतल्याचे प्रमाणपत्र आता ब्रिटनमध्येही चालू शकेल. परराष्ट्र मंत्रालय व आरोग्य मंत्रालय अन्य देशांच्या सतत संपर्कात असून, त्यामुळे भारतात येणारे व भारतातून अन्य देशात जाणारे यांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
हे आहेत महत्त्वाचे देश
या ९६ देशांमध्ये अमेिरका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, बांग्लादेश, फिनलँड, स्पेन, तुर्कस्थान, रशिया, मॉरिशस, यूएई, स्वित्झर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रिया, ओमान, कुवेत, बहारीन, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, फिलिपिन्स, जमाईका, जॉर्जिया, श्रीलंका आदींचा समावेश आहे.