नवी दिल्ली - देशभरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील युवकांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, युवकांना देण्यात येत असलेल्या या लसींच्या डोसची मुदत संपली असल्याच्या तक्रारी सोशल मीडियातून येत आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करत याबाबत माहितीही आहे. मात्र, याबाबत आता आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिलंय. भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसी दिल्या जात आहेत, अशा आशयाच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
''माझा मुलगा लसीचा पहिला डोस घेण्यासाठी गेला असता, संबधित लस नोव्हेंबर महिन्यातच एक्सपायर झाल्याचं निदर्शन आलं. त्यानंतर, आम्हाला एक पत्र दाखविण्यात आलं. त्यामध्ये, एक्सपायरी डेट वाढविण्यात आल्याचे दिसून आले. असं का, कोणत्या आधारावर?'' असा प्रश्न नवनिता वरडपांडे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. नवनिता यांचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. त्यानंतर, सरकारच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आलंय. कोविड-19: गैरसमज आणि सत्य या मथळ्याखाली एका परित्रकातून आरोग्य विभागाने आपली बाजू मांडली आहे.
दोन्ही लसींच्या कार्यक्षमता स्थिरतेच्या अभ्यासाविषयी लस निर्मात्यांनी दिलेल्या माहितीचे परीक्षण तसेच समावेशक विश्लेषण यांच्या आधारेच राष्ट्रीय नियामक संस्थेने या लसींची साठवण मुदत मर्यादा वाढविली असल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.