नवी दिल्ली : विदेशात विकसित झालेल्या व परिणामकारक ठरलेल्या कोरोना लसींच्या भारतात पुन्हा चाचण्या करण्याचे बंधन केंद्र सरकारने आता दूर केले आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला असून लसींचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे देशविदेशातील अधिकाधिक लसी उपलब्ध होणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड व स्पुतनिक या तीन लसींचा वापर केला जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन लसींचे उत्पादन भारतात होते व स्पुतनिक ही रशियन बनावटीची लस आहे. सध्या देशात कोरोना लसींचा मोठा तुटवडा असून त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही झाला आहे. त्यामुळे कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा होण्याबाबत केंद्र सरकार फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडेर्ना आदी विदेशी औषध कंपन्यांशी सध्या चर्चा करत आहे.विदेशात बनलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन वापरासाठी तात्काळ मंजुरी दिली जाईल, असे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केले होते. मात्र, या लसींच्या भारतात चाचण्या झाल्या पाहिजेत या अटीवर केंद्र सरकार ठाम होते. त्यामुळे विदेशातील एकाही लसनिर्मिती कंपनीने केंद्राकडे अर्ज पाठविला नाही. मात्र, आता ही अट केंद्र सरकारने आता रद्द केली आहे.विदेशी लसनिर्मिती कंपन्यांनी आपली कोरोना प्रतिबंधक लस घेऊन भारतात यावे. त्या लसीचे भारत व जगासाठी इथे उत्पादन करावे, असे नवे धोरण केंद्र सरकारने राबवायचा निर्णय घेतला आहे. देशातील फक्त ३ टक्के लोकांचेच अद्याप लसीकरण होऊ शकले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता त्वरेने पावले उचलणे आवश्यक बनले आहे.फक्त केंद्र सरकारशीच चर्चा करणारकोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या पहिल्या दहा देशांत भारतातील लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा व्हावा यासाठी देशातील काही राज्यांनी जागतिक निविदाही काढल्या. पण फायझर, मॉडेर्नासारख्या औषध कंपन्यांनी आम्ही फक्त केंद्र सरकारशीच चर्चा करणार असल्याची भूमिका घेतली आहे.
१२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझरची लस प्रभावी असल्याचा दावाआम्ही बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी प्रभावी ठरली असून तिच्या आपत्कालीन वापरासाठी तातडीने मंजुरी द्यावी अशी विनंती फायझर या कंपनीने केंद्र सरकारला केली आहे.