लखनौ - देशात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठ लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, कोरोना विरोधातील लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. आता देशात 18 वर्षांवरील लोकांनाही लस देण्यात येत आहे. तर, 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचा दुसरा डोस घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशात लसीकरण करताना कॉकटेल झाल्याचं आढळून आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यात लसीकरणादरम्यान नागरिकांना पहिला डोस कोविशिल्ड लसीचा देण्यात आला होता. मात्र, दुसरा डोस देताना कोव्हॅक्सीन लस वापरण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. लसीकरणाच्या या कॉकटेल प्रकियेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही चूक झाल्याचे मान्य केलं आहे. याप्रकरणाती निष्काळजी कर्मचाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
औदहीकला गावातील रामसूरत यांनी आपबिती सांगताना भीती व्यक्त केली. मला व माझ्या सहकाऱ्यांना जिल्ह्याच्या बढनी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक एप्रिल रोजी कोविशिल्ड लस टोचण्यात आली होती. त्यानंतर, 14 मे रोजी या सर्वांनाच दुसरा डोस देण्यात आला. त्यावेळी, एनएनएमने आणखी लशींची मागणी केल्यानंतर ही चूक लक्षात आली. कारण, दुसऱ्या डोसवेळी या सर्वांनाच कोव्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे, लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांचीही भांबेरी उडाली असून पुढं काय होतंय, याची भीती मनात निर्माण झाली आहे.
या घटनेची वरिष्ठ डॉक्टरांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईही करण्यात येईल, असे जिल्ह्याचे सीईओ संदीप चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. दरम्यान, यापूर्वीही एप्रिल महिन्यात पहिल्याच आठवड्यात असा प्रकार घडला होता. शामली येथील गावकऱ्यांना कोरोना व्हॅक्सीनऐवजी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं होतं.