नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनावर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे.
"केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचंही लसीकरण पूर्ण करू शकलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीनं आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली" असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच "केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी केली होती. लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता प्रत्येक दिवशी जवळपास 19 लाख नागरिकांचं लसीकरण पार पडत आहे."
"सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारनं देशासमोर ठेवलेली नाही. कोरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?" असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला आहे. तसेच "लसीच्या वितरणासंबंधी केंद्र सरकार दिशाहीन आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन नीतीमुळे अनेक राज्यांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं लागलं."
"आज मॉडर्ना, फायजर यांसारख्या लस कंपन्यांनी राज्यांशी थेट व्यवहार करण्यास नकार देत केंद्राशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ग्लोबल टेंडर काढायला लावून राज्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनण्याची वेळच का आली?" असे अनेक प्रश्न प्रियंका यांनी केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी देखील प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर लसीकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत" अशी परिस्थिती असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं.
"भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?" कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तसेच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.