नवी दिल्ली: कोरोना व्हायरसची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या 1 औषध आणि दोन नवीन लसींना मान्यता दिली आहे. भारतात कॉर्बेवॅक्स (CORBEVAX) आणि कोवोवॅक्स (COVOVAX) लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, मोलनुपिरावीर (Molnupiravir) या औषधालाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज ट्विट केले आहे. सर्व नागरिकांचे अभिनंदन. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक भक्कम पाऊल टाकत, आम्ही कॉर्बेवॅक्स लस आणि कोवोवॅक्स लस या दोन लसींसह अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरलाही मंजुरी दिली आहे. या औषधांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पुढील ट्विटमध्ये लिहिले की, कॉर्बेवॅक्स लस ही हैदराबादस्थित फर्म बायोलॉजिकल-ईने बनवलेली कोरोनाविरुद्धची भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब-युनिट लस आहे. ही हॅट्ट्रिक आहे! आता तिसरी लस भारतात विकसित झाली आहे. तसेच, नॅनोपार्टिकल लस, कोवोवॅक्सची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे करण्यात येणार आहे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, मोलनुपिरावीर हे कोरोनाच्या वयस्कर रूग्णांच्या उपचारासाठी आणि ज्यांना रोग वाढण्याचा उच्च धोका आहे, अशा रुग्णांच्या उपचारासाठी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी देशातील 13 कंपन्यांद्वारे तयार केले जाणार आहे. दरम्यान, मोलनुपिरावीर हे कोरोनावरील अँटीव्हायरल औषध म्हणजेच गोळी आहे.
दरम्यान, देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या ही 653 इतकी झाली आहे. देशात सोमवारी ओमाक्रॉनचे 135 नवीन रुग्ण आढळून आले. ओमायक्रॉनच्या एका दिवसात आढळून येणारी रुग्णांची ही आतापर्यंतही सर्वात मोठी संख्या आहे. सर्वाधिक रुग्ण हे दिल्ली आणि महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात 167 आणि दिल्लीत 165 रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत.