कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात होऊ शकतो वापर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अखिलेश यादवांच्या सुरात सूर
By बाळकृष्ण परब | Published: January 3, 2021 05:29 PM2021-01-03T17:29:14+5:302021-01-03T17:32:17+5:30
Corona vaccine update : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल भाजपाची लस घेणार नसल्याचे विधान केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशिद अल्वी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
नवी दिल्ली -कोरोनाच्या वाढत्या फैलावादरम्यान सर्वांना प्रतीक्षा असलेल्या कोरोनावरील लसींना आता मान्यता मिळाली आहे. मात्र भारतात कोरोनाच्या लसींना मान्यता मिळाल्यानंतर आता त्यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल भाजपाची लस घेणार नसल्याचे विधान केल्यानंतर आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही आता त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात वापर होऊ शकतो, अशी शंका काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनी व्यक्त केली आहे.
रशिद अल्वी म्हणाले की, ज्याप्रकारे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीचा वापर विरोधी पक्षांविरोधात करत आहे. त्यावरून अखिलेश यादव यांना कोरोना लसीबाबत वाटत असलेली भीती रास्त आहे. सरकार ज्या प्रकारे विरोधी नेत्यांविरोधात काम करत आहे, तो पाहता ही भीती योग्य आहे. भाजपा सरकार विरोधी नेत्यांविरोधात खटले चालवत आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहता सरकारने कोरोनावरील लसीबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले पाहिजे.
The way BJP & PM have used agencies including CBI, Income Tax Dept & ED against opposition leaders, I think there's nothing wrong with it if Akhilesh Yadav fears that vaccine can be misused. The way govt is working against opposition leaders,fear is justified:Rashid Alvi,Congress pic.twitter.com/qXuXRsmzdW
— ANI (@ANI) January 3, 2021
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही काल असेच विधान केले होते. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते. जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.