नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता दोन वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. DCGI नं कोवॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर आता चिमुकल्यांसाठी खास लसीकरण केंद्र उभारण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये लहान मुलांसाठी Kids Vaccination Center सुरू करण्यात येत आहे.
वॅक्सीनेशन सेंटरमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामध्ये पिण्याचं पाणी, उत्तम फर्निचर, लहान मुलांसाठी झोका आणि महिलांसाठी सॅनिटरी पॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात आता या लसीकरण सेंटरची जोरदार चर्चा रंगली आहे. लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटू नये यासाठी मुलांच्या आवडीच्या गोष्टी केंद्रावर ठेवण्यात आल्या आहेत. छोटा भीम, डोरेमॉनसारखे कार्टून कॅरेक्टर पार्कमध्ये तयार केले आहेत. मोठ्या प्रमाणात खेळणी देखील ठेवण्यात आली आहेत.
मुलांसाठी तयार करण्यात आलेलं लसीकरण केंद्र सर्वांचंच वेधून घेतंय लक्ष
मोठ्यांच्या लसीकरणासाठी जसं आरोग्य विभागानने रुग्णालयासह, सार्वजनिक ठिकाणी, शाळांमध्ये लसीकरण केंद्र तयार केलं होतं. तसच आता मुलांसाठी नवीन तयार करण्यात आलं आहे. मुलांसाठी तयार करण्यात आलेलं हे लसीकरण केंद्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील 20 देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीची 3 टप्प्यात चाचणी घेण्यात आली. सप्टेंबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होऊन आशादायक चित्र पुढे आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने 2 वर्षावरील मुलांसाठी कोवॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे.
नागपूरात घेतली होती लहान मुलांवर चाचणी
भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी नागपुरात घेण्यात आली होती. 2 ते 18 वयोगटांतील जवळपास 175 मुलांवर ही चाचणी झाली. कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी 2 ते 6, 7 ते 12 आणि 13 ते 18 या तीन वयोगटांत विभागणी करून घेण्यात आली होती. दिल्लीच्या एम्समध्येही लहान मुलांवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या चाचणीचे रिपोर्ट आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आले. त्यानंतर आता या लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे