नवी दिल्ली - सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशननं कोविड १९ साठी बनवलेल्या तज्ज्ञ समितीने गुरुवारी कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन(Covaxin) मिक्स करून त्यावर अभ्यास करण्याची शिफारस केली आहे. त्यासोबत तज्ज्ञांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि नेजल व्हॅक्सिन यांचंही संयुक्त मिश्रण करण्याची शिफारस केली आहे. बायोलॉजिकल ई (Biological E) च्या लहान मुलांवरील लसीच्या क्लिनिकल चाचणीला परवानगी देण्याची शिफारस केली आहे. परंतु अखेर निर्णय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) घेणार आहे.
तामिळनाडूच्या वेल्लोर स्थित क्रिश्चियन मेडिकल कॉलेजने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा मिक्सिंग डोस(Mixing Dose) वर स्टडी करण्यासाठी अर्ज दिला होता. यावर तज्ज्ञ समितीने क्रिश्चियन मेडिकल कॉलेजला ही स्टडी करण्याची परवानगी द्यावी अशी शिफारस केली आहे. स्थानिक वृत्तानुसार, तज्ज्ञांनी सीएमसीला फेज ४ चे क्लिनिकल चाचणीला मान्यता मिळावी अशी शिफारस केली आहे. ज्यात ३०० लोकांना कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येतील.
या स्टडीचा उद्देश हा आहे की आगामी काळात लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे म्हणून विविध लसींचे डोस दिले जाऊ शकतात यावर अभ्यास सुरू आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक कोरोनाच्या नेजल लसीवरही काम करत आहे. तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि नेजल व्हॅक्सिनच्या मिक्सिंगसाठीही शिफारस मागितली आहे.
लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी
तज्ज्ञांच्या समितीने तिसरा महत्त्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे बायोलॉजिकल ई च्या कोरोना लसीला लहान मुलांवर चाचणी करण्याची परवानगी मिळण्याची शिफारस केली आहे. बायोलॉजिकल ई ५ वर्ष ते १७ वर्षीय लहान मुलांवर दोन टप्प्यात क्लिनिकल चाचणी पूर्ण करणार आहे. त्याचसोबत कमिटीनं १८ वर्षावरील लोकांवर सुरु असलेल्या चाचणीचे रिपोर्ट मागवले आहेत. लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची क्लिनिकल चाचणी करण्याची शिफारस मिळणारी ही चौथी लस आहे. याआधी भारत बायोटेक, जायडस कॅडिला आणि नोवोवॅक्सला मंजुरी मिळण्याची शिफारस दिली होती. भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाची चाचणी लहान मुलांवर सुरू आहे. तर नोवोवॅक्सची लस कोवोवॅक्सच्या क्लिनिकल चाचणीला परवानगी मिळावी यासाठी अलीकडेच शिफारस करण्यात आली आहे.