मुंबई – मागील २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगासमोर मोठं संकट उभं केले आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटनं लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय पुढे आला. वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन कोविडवर लस शोधून काढली. भारतात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन या दोन प्रमुख लसी भारतीयांना देण्यात आल्या. आता Covishield लसीबाबत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.
कोविशील्ड लसीची किंमत निम्म्याहून कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले की, आमच्या इन्स्टिट्यूटनं खासगी हॉस्पिटलसाठी कोविशील्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून कमी करत २२५ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर कोविशील्ड लसीच्या किंमतीत घट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आता १८ वर्षावरील सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केले आहे.
जनतेच्या हितासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस त्यांच्या लसीची किंमत २२० रुपये आणि जीएसटी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, Covisheild, Covaxin आणि Covovax या लसी २२० रुपयांत खासगी लसीकरण केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये GST शुल्कासह मिळू शकतात. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत, केंद्र सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना खबरदारी म्हणजेच बूस्टर डोस घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रौढ व्यक्ती खासगी केंद्रात जाऊन १० एप्रिलपासून बूस्टर डोस घेऊ शकतात. ज्या लोकांनी दुसरा डोस ९ महिन्यांपूर्वी घेतला आहे. ते या बूस्टर डोससाठी पात्र असतील.
बूस्टर डोस का गरजेचा आहे?
कोरोना व्हायरसचे आतापर्यंत Delta, Delta Plus, Omicron, Deltacron, XE, Kappka व्हेरिएंट आले आहेत. त्यांच्याशी सामना करण्यासाठी सरकारकडून ठराविक कालावधीनंतर लसीचे दोन डोस लोकांना दिले जात आहेत. ICMR DG डॉ. बलराम भार्गव यांच्या मते, विषाणूचा एक व्हेरिएंट दुसर्या व्हेरिएंटविरूद्ध संरक्षण प्रदान करत नाही, म्हणून पुन्हा संसर्गाची प्रकरणे तिसऱ्या लाटेमध्ये दिसून आली. म्हणजे कालांतराने लोकांची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक ठरतो. लसीकरणामुळे गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.