नवी दिल्ली – गेल्या २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीनं हाहाकार केला. मात्र लसीकरणामुळे(Corona Vaccine) बहुतांश देशात कोरोना नियंत्रणात आला. भारतातही कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या लसी लोकांना देण्यात आल्या. आता कोविशील्ड लसीच्या २ डोसमध्ये अंतर पुन्हा कमी करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने याबाबत केंद्र सरकारला शिफारस केली आहे.
NTAGI नं म्हटलं आहे की, कोविशील्ड(COVISHIELD) लसीच्या २ डोसमधील अंतर कमी करून ८ ते १६ आठवडे केले जावे. यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे होते. मात्र आता आलेल्या नव्या शिफारसीनंतर हे अंतर घटवण्यात येणार आहे. परंतु लसीकरण अभियानात याची अंमलबजावणी कधी होईल हे अद्याप स्पष्ट नाही. त्याचसोबत कोव्हॅक्सिन(Covaxin) लसीच्या २ डोसमधील अंतर कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. भारतात कोव्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर २८ दिवसांचं आहे.
अधिकृत सूत्रांनुसार, NTAGI ने जागतिक स्तरावरील आकडेवारी पाहून यावर दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे. कोविशील्डचा दुसरा डोस आठ आठवड्यानंतर दिला तर त्यापासून तयार होणारी एन्टीबॉडी १२ ते १६ आठवड्यानंतर मिळणाऱ्या डोस इतकीच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या शिफारसीला मंजुरी दिल्यानंतर देशात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या लोकसंख्येत बरेच अंतर आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत असल्याने दोन डोसमधील अंतर कमी करण्याचं कारण मानलं जात आहे.
भारतात रुग्णसंख्येत घट
कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस अशावेळी आलीय जेव्हा भारतात कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत घट होत आहे. मागील २४ तासांत भारतात एकूण कोरोनाचे १ हजार ७१६ रुग्ण आढळले आहेत. देशात शुक्रवारी २ हजार ७५ कोरोना रुग्ण आढळले होते. म्हणजे शनिवारी रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी घट झाल्याचं दिसून आले. मागील २४ तासांत देशात १२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.