नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 35,662 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेण्यास एका कुटुंबाने नकार दिल्याने त्यांचं विजेचं, नळाचं कनेक्शन कापल्याची तसेच रेशनकार्ड जप्त केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या पूजा कॉलनीमध्ये राहणाऱ्या वाहिदा खान यांच्या कुटुंबीयांनी लस देण्यासाठी घरी आलेल्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, "एक टीम लसीकरणाची माहिती घेण्यासाठी घरी आली होती. तेव्हा त्यांना अलर्जी असल्यामुळे अद्याप कोरोना लस घेतली नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. तसेच 28 तारखेला आम्ही लस घेऊ असं देखील सांगितलं. पण आलेल्या टीमने आताच्या आता लस घेण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा आम्ही यासाठी तयार झालो नाही तेव्हा त्यांनी आमच्या घराचं विजेचं आणि नळाचं कनेक्शन कापलं. तसेच आमचं रेशनकार्ड देखील जप्त" केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. वाहिदा यांनी कोरोना लस देण्यासाठी एक टीम घरी आली होती. त्यामध्ये सीएमओ आणि एसडीएम देखील होते असं म्हटलं आहे.
"आमचं पाण्याचं आणि विजेचं कनेक्शन कापलं"
आम्ही कोरोना लस घेण्यास नकार दिला असता अधिकाऱ्यांनी नगरपालिका आणि वीज विभागातील काही लोकांना बोलावून घेतलं. त्यांनी आमचं पाण्याचं आणि विजेचं कनेक्शन कापलं. आमचं रेशनकार्ड देखील ते घेऊन गेले असं वाहिदा यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरणाचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे. जर खरंच अशा स्वरुपाची घटना घडली असेल तर त्याचा अधिक तपास करण्यात येईल. तसेच याबाबच चौकशी सुरू आहे. तपासात काही समोर आल्यास त्याचं कापण्यात आलेलं कनेक्शन जोडून देण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चिंताजनक! 'कोरोना लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका दहापट जास्त'; रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोनाबाबतच्या रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक असल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण हे दहापट अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं अमेरिकेतील विविध भागांत हा प्रयोग केला आहे. कोरोना लसीच्या रिसर्चसाठी 13 विविध राज्यं आणि शहरांतील 6 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे रिपोर्ट्स, त्यांच्या आजारांचं गांभीर्य, रुग्णालयामध्ये दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यूचे आकडे या बाबींचं सर्वेक्षण केलं. 4 एप्रिल ते 17 जुलै या कालावधीत 18 वर्षांवरील नागरिकांचे नमुने यासाठी तपासण्यात आले.