नवी दिल्ली : देशात कोरोनाचे ९३.२४ लाख लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९४.८८ टक्के झाले आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ९८.२६ लाखांवर पोहोचली असून, सक्रिय रुग्णांचा आकडा साडेतीन लाख आहे. नव्या रुग्णांची संख्याही कमी असून, मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. देशातील कोरोना महामारीचे संकट मंदावल्याने आणि लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याने लवकरच भारतीयांना लसीचा डोस देण्यासंदर्भात गतीमान हालचाली सुरू आहेत. केरळचेमुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.
केरळचेमुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केरळमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा विजयन यांनी केली. आत्तापर्यंत भाजपाशासित मध्य प्रदेश आणि बिहार राज्यात कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे, मोफत लस देणारे केरळ हे तिसरे राज्य असणार आहे. तर, भाजपा शासनव्यतिरिक्त राज्यात कोरोना लसीची घोषणा करणारे केरळ हे पहिलेच राज्य ठरले आहे.
केरळमध्ये शनिवारी 5,949 रुग्ण आढळून आले आहेत, तर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6.64 लाख एवढी झाली असून आत्तापर्यत 2594 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही मुख्यमंत्री विजयन यांनी दिली. तसेच, लसीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून लोकांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे, लसीकरण मोहिम राबविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचंही विजयन यांनी सांगितलं.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३,५९,८१९ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण ३.६६ टक्के आहे. कोरोनातून ९३,२४,३२८ जण बरे झाले असून, एकूण रुग्णसंख्या ९८,२६,७७५ आहे. शनिवारी आणखी ३०,००६ नवे रुग्ण सापडले, तसेच या दिवशी कोरोनामुळे आणखी ४४२ जण मरण पावले असून, बळींचा आकडा १,४२,६२८ झाला आहे. कोरोनाच्या नव्या बळींपैकी ७८.०५ टक्के जण हे १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ७ कोटी १५ लाख आहे. त्यातील ४ कोटी ९६ लाख लोक बरे झाले आहेत, तर १६ लाखांहून अधिक जण मरण पावले. अमेरिकेत १ कोटी ६२ लाख कोरोना रुग्ण आहेत.
फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेची परवानगी
फायझर-बायोटेक कंपनीने संयुक्तरीत्या विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेने परवानगी दिली. त्यामुळे त्या देशात लवकरच लसीकरणाला प्रारंभ होईल. मॉडर्ना कंपनीने बनविलेल्या कोरोना लसीचे आणखी १० कोटी डोस विकत घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
नारायण मूर्तींनी व्यक्त केली मोफत लसीची अपेक्षा
कोरोना लसीचे उत्पादन सुरू असून बाजारात येताच लसीचा परिमाण सकारात्मक दिसला पाहिजे. तसेच, सर्वांनाच ही लस मोफत दिली गेली पाहिजे, असे मला वाटते. पृथ्वीतलावरील सर्वच मनुष्यजातीला ही लस मोफत मिळावी, असे नारायण मूर्ती यांनी म्हटलंय. लस बनविणाऱ्या सर्वच कंपन्यांना संयुक्त राष्ट्र किंवा देशातील सरकारकडून अनुदान दिले पाहिजे. कंपन्यांना फायदा कमविण्यासाठी हे अनुदान नसून लस बनविण्याच्या खर्चाचा मदतनिधी म्हणून द्यावे, असेही मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कोरोना लसीसंदर्भात बिहार निवडणुकांवेळी भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन बिहारमधील नागरिकांना दिलं होतं. त्यानंतर, भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. केवळ, बिहारचं का, देशातील इतर राज्यात का नाही, असा प्रश्न अनेकांनी केंद्र सरकारला विचारला होता. तसेच, केंद्र सरकार म्हणून देशातील सर्वच नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणे ही जबाबदारी नाही का, असाही प्रश्न विरोधक आणि सुज्ञ नागरिकांनी विचारला होता.