नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,37,16,451 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,870 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 378 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,47,751 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. याच दरम्यान लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर चेहरा वाकडा झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील तरुणीने कोरोना लसीकरणानंतर आपला चेहरा वाकडा झाला असं म्हटलं आहे.
तरुणीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तिने कोविशिल्ड लस घेतली होती. यानंतर दोन दिवस तिला वेदना होत होत्या आणि तिसऱ्या दिवशी तिचा चेहरा वाकडाच झाला. तसेच दोन दिवस तिच्या खांद्यामध्ये आणि मानेत तीव्र वेदना होत होत्या. तिसऱ्या दिवशी सोमवारी 27 सप्टेंबरला ती सकाळी उठली तेव्हा तिला आपला चेहरा वाकडा झाल्याचं दिसलं. तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली.
कोरोना लसीमुळे फेस पॅरालिसिस झाल्याचा तरुणीचा दावा
डॉक्टारांनी तरुणीला फेस पॅरालिसिस म्हणजे तिच्या चेहऱ्याला लकवा मारल्याचं सांगितलं. तिला काही औषधंही देण्यात आली. पण बरं होण्यास खूप वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आपल्याला कोरोना लसीमुळे फेस पॅरालिसिस झाला असा दावा या तरुणीने केला आहे. ती तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तिने प्रशासनाकडून उपचारासाठी मदत मागितली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर देखील तो रुग्णांचा पाठ सोडत नाही आहे. लोकांना विविध समस्या भेडसावत आहेत. काही लोकांची शुगर वाढत आहेत. तर काहींना थकवा जाणवतोय. तर काहींना श्वास घेताना अडचण येत असून वास घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे. अशा तक्रारी या कोरोनाग्रस्तांमध्ये पाहायला मिळत आहेत.
कोरोना रुग्णांचं कमी होतंय वजन, कुपोषणाचाही सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोना रुग्णांचं आता वजन कमी होत असून कुपोषणाचाही सर्वाधिक धोका असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये कुपोषणाची समस्या पाहायला मिळत आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने हा रिसर्च केला आहे. रिसर्चनुसार, जवळपास 30 टक्के कोरोना रुग्णांचं वजन हे पाच टक्क्यांपर्यंत कमी झालं होतं. तर अर्ध्याहून अधिक रुग्णांना कुपोषणाचा सर्वाधिक धोका आहे. ज्या रुग्णांना याआधी गंभीर स्वरुपात म्युकोरमायसिस म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झाली होती त्यांच्यामध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आढळून आलं आहे. अनेक कोरोना रुग्णांना थकवा जाणवतं आहे. तसेच अशक्तपणा देखील आला आहे.