नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांचा आकडा तब्बल 1,02,24,303 वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. लस तयार करण्यात येत असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. मात्र आता कोरोनाची लस येण्याआधीच यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.
गायीचं रक्त असणारी कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे. स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे.
स्वामी चक्रपाणि यांनी "कोरोना संपला पाहिजे आणि लसही लवकरात लवकर देण्यात आली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतीही कंपनी एखादं औषध बनवते तेव्हा त्यामध्ये काय आहे याची माहिती दिली जाते. मग कोरोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिली जात नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकामध्ये जी लस तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये गायीचं रक्त वापरण्यात आलं आहे" असा दावा केला आहे.
"जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल"
"सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानण्यात येतं. जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेलं तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरणाचं काम हाती घेण्यात यावं" असं देखील स्वामी चक्रपाणि यांनी म्हटलं आहे. चक्रपाणि यांनी प्रामुख्याने अमेरिकेतील लसीसंदर्भात भाष्य केलं आहे. गायीचं रक्त वापरण्यात आलेली लस ही अमेरिकेतील लस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.