कोरोनाच्या दोन्ही लाटांनी एकूणच जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मात्र, आता हळूहळू जग यातून सावरू लागले आहे. लसींचे उत्पादन आणि लसीकरण या दोन्हींचा वेग वाढला आहे. फायझरने आता कोरोनावर प्रभावी ठरू शकेल, अशी गोळीही बाजारात आणण्याचा घाट घातला आहे.
प्रोटीज इनहिबिटर म्हणजे? प्रोटीज इनहिबिटर एचआयव्ही आणि हेपेटायटिस सी यांच्यावरील उपचारासाठी वापरले जाते. शरीरात विषाणूची पुनर्निर्मिती होऊ नये, त्यास प्रतिबंध व्हावा यासाठी प्रोटीज इनहिबिटर उपयुक्त ठरते. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात फायझरने ‘पीएफ-०७२१३३२’ या नावाने मौखिक प्रोटीज इनहिबिटरच्या नैदानिक चाचण्या सुरू केल्या. जूनमध्ये फायझरने या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले असून मौखिक प्रोटीज इनहिबिटर पाचपट परिणामकारक असल्याचे स्पष्ट केले. जुलैमध्ये फायझरने या औषधाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात केली.
काय आहे औषध?फायझरने बायोएन्टेकच्या साह्याने बीएनटी१६२बी२ नावाची कोरोनाप्रतिबंधक लस तयार केली. आता फायझर कोरोनावर प्रभावी ठरू शकेल असे औषध बनविण्याच्या तयारीत आहे. प्रोटीज इनहिबिटर असे हे औषध असून ते विषाणूप्रतिरोधी आहे.
कोरोनावर याचा काय उपयोग? फायझरच्या प्रोटीज इनहिबिटरला बाजारात प्रचंड मागणी येण्याची शक्यता आहे. तोंडावाटे दिले जात असल्याने फायझरच्या पीएफ-०७३२१३३२ कोरोनाबाधितांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकेल, असे अमेरिकी तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे आणि पूर्णत: लसीकरण झालेले नाही, अशांसाठी फायझरची ही ‘गोळी’ अधिक परिणामकारक ठरणार आहे. वर्षअखेरपर्यंत या गोळीला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी मिळेल, असा विश्वास फायझर कंपनीला आहे.