चंढीगड - कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य माणूस आपलं योगदान देत आहे. मात्र, याच कालावधीत परिस्थितीचा गैरफायदा घेणारेही कमी नाहीत. सध्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आहे. मात्र, दुसरीकडे या इंजेक्शनचा काळाबाजारही होताना अनेकांना अटक करण्यात आली. या परिस्थितीही माणुसकी हरवलेल्यांना मंत्री जयंत पाटील यांनी टप्प्यात घेऊन मोलाचा सल्ला दिलाय.
हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या (Corona vaccine theft) जवळपास शंभर डोसची चोरी केली होती. मात्र, गुरुवारी या चोराने येथील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर चोरलेली सर्व औषधे एका चहा विक्रेत्याकडे दिली आणि ते सर्व डोस पोलिसांना देण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यामध्ये एक चिठ्ठीही सापडली, ज्यामध्ये त्याने - 'सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे', असं लिहिलं होतं. चोरट्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लोकांचे जीव महत्त्वाचे असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.
हरियाणातील या चोरट्यानं लिहिलेली चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनीही या चोरट्याची चिठ्ठी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. तसेच, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत जीवनरक्षक ठरणाऱ्या औषधांचा काळाबाजार करत आहेत. त्यांनी हरियाणातील या चोराकडून धडा शिकायला हवा, असे ट्विट जयंत पाटील यांनी केलंय.
रात्री चोरलेले डोस, सकाळी परत आणून ठेवले
बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीचे अनेक डोस चोरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकर यांनी दिली. परंतु, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोर सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाच्या वयोवृद्ध मालकाकडे गेला आणि त्याच्याकडे एक पिशवी दिली. त्याने त्या चहावाल्याला सांगितले की, हे एका पोलिसाचे जेवण आहे. बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला. नंतर तो दुकानदार ती बॅग घेऊन पोलीस ठाण्यात गेला. तेथे उपस्थित पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा त्यात कोविशिल्डचे 182 आणि कोवाक्सिनच्या 440 डोस दिसून आले. त्यात, एक चिठ्ठीही आढळून आली. ज्यामध्ये असे लिहिले होते, सॉरी, मला माहीत नव्हतं यात कोरोनाचं औषध आहे.
चोरट्यानेही कोरोनाची गंभीर परिस्थिती ओळखून लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. मात्र, अनेकजण इंजेक्शनचा काळाबाजार करुन पैसा कमविण्याचा प्रयत्न करत आहेत.