नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात आणि जगात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याअंतर्गत 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे 12 मुलं कोरोना लस घेतल्यानंतर अचानक आजारी पडले आहेत. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठिक असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोनाची लस दिल्यानंतर घाबरून ही सर्व मुले आजारी पडल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी अशोक अवधीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना लस दिली जात होती, परंतु लस दिल्यानंतर ते सर्व भीतीमुळे आजारी पडले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला, भारतात कोरोना लसीकरण मोहीम वाढवत, 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई कंपनीने विकसित केलेली कॉर्बेवॅक्स लस या वयोगटातील मुलांना दिली जात आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत 12-14 वयोगटातील एक कोटीहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले. त्यांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे, ज्याचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी गमावले आई-बाबा; सरकारी आकडेवारीची पोलखोल
कोरोना काळात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी आई किंवा बाबा यामधील एकाला गमावलं आहे. सरकारी आकडेवारीची आता पोलखोल झाली आहे.आईवडील गमावलेल्या मुलांचे आकडे गुजरात विधानसभेमध्ये आता समोर आले आहेत. त्यामुळे सरकारी कागदपत्रांमध्ये असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीची पोलखोल झाली आहे. आई आणि वडील हे दोन्ही गमावलेल्या लहान मुलांना दर महिना चार हजार रुपये तर पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा याआधी गुजरात सरकारने केली आहे. विधानसभेत जेव्हा हे आकडे समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत सरकारकडे 27 हजार 674 अर्ज हे मदतीसाठी आले आहेत. ज्यामधील 20,970 अर्ज हे स्वीकारण्यात आले आहेत. तर 3 हजार 665 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. 3009 अर्जांवर सरकारचा निर्णय अद्याप बाकी आहे.