नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना योद्ध्यांनंतर आता एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोफत लस मिळणार आहे. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमधील सर्व मंत्री पैसे देऊन कोरोनाची लस टोचून घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. (ravi shankar prasad told that pm modi cabinet ministers will get vaccination by paying the amount)
याचबरोबर, सर्व योग्य मंत्री या कोरोना लसीचा खर्च स्वत: करतील. यानंतर ही संख्या वाढेल, असेही केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. दरम्यान, येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल. 10 हजार सरकारी, तर 20 हजार खासगी केंद्रांवर कोरोना लस उपलब्ध असणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
याशिवाय, 45 वर्षांवरील सहव्याधी (कोमॉर्बिडीटीज) असलेल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींना सरकारी केंद्रांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोरोना लस घ्यायची असेल, त्यांना लसीचे पैसे मोजावे लागतील. त्या लसीचे दर केंद्रीय आरोग्य मंत्री येत्या तीन-चार दिवसात रुग्णालय प्रशासनांशी बोलून ठरवतील, अशी माहितीही प्रकाश जावडेकर यांनी दिली.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणे हे दिलासा देणारे आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना मान्यता देण्यात आल्यानंतर भारतामध्ये 16 जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.