नवी दिल्ली - कोरोना विरोधातील लढाईत आज भारताने ऐतिहासिक यश मिळवले आहे. या लढाईत, भारताने लसीकरणाच्या बाबतीत तब्बल 100 कोटींचा टप्पा (100 crore Vaccination) गाठला आहे. देशाला हा मैलाचा दगड पार करण्यासाठी भलेही 9 महिन्यांचा काळ लागला असेल, पण खरे तर, ही गेल्या 2-3 महिन्यात लसीकरणाच्या वाढलेल्या वेगाचीच कमाल आहे. चीननंतर, सर्वाधिक कोरोना लसीचे डोस भारतातच दिले गेले आहेत. या यशाच्या सेलिब्रेशनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) स्वतःच आरएमएल (RML) हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.
फक्त 276 दिवसांत साध्य केलं लक्ष्य -भारताने केवळ 276 दिवसांतच 100 कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य साध्य केले आहे. रोजच्या सरासरीचा विचार करता, ही सरासरी 36.23 लाख लसींचे डोस, अशी राहिली आहे. पण गेल्या जवळपास 50 दिवसांतच 44 कोटी डोस देण्यात आले आहेत.
भारताला 50 कोटी कोरोना लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुमारे 202 दिवस लागले. पण उर्वरित 50 कोटी डोस टोचण्यासाठी केवळ 76 दिवसच लागले. यावरूनच ऑगस्ट महिन्यापासून वाढलेल्या कोरोना लसीकरणाच्या गतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. भारताने 6 ऑगस्टला 50 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढतिवसाच्या म्हणजेच 17 सप्टेंबरला विक्रमी लसीकरण झाले होते. यादिवशी लसीकरणाचा आकडा 2.5 कोटींच्याही पुढे गेला होता.
87.7 टक्के लोकांना टोचण्यात आली कोविशील्ड लस -भारतात 16 जानेवारीपासूनच लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आपत्कालीन वापरासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनला मंजुरी देण्यात आली आहे. CoWIN अॅपनुसार, 100 कोटींपैकी 87.7 टक्के वाटा कोव्हिशील्डचा आहे. तर 11.4 टक्के वाटा हा कोव्हॅक्सीनचा आहे. तसेच, स्पुतनिक लस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 0.5 टक्के एवढी आहे.
कोरोना लसिकरणाचा ग्राफ - 01-10 कोटी - 85 दिवस10-20 कोटी - 45 दिवस20-30 कोटी - 29 दिवस30-40 कोटी - 24 दिवस40-50 कोटी - 20 दिवस50-60 कोटी - 19 दिवस60-70 कोटी - 13 दिवस70-80 कोटी - 11 दिवस80-90 कोटी - 12 दिवस 90-100 कोटी -19 दिवस