नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाख लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Former Uttarakhand chief minister Trivendra Singh Rawat) यांनी एक विधान केलं आहे. मुस्लीम समाजातील लोक कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात मुस्लीम समाजामध्ये अनेक गैरसमज असल्याचं देखील रावत यांनी म्हटलं आहे.
त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रावत यांनी आपलं परखड मत मांडलं. "मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम समाजातील लोक सध्या लसीकरणापासून दूर राहत आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत आणि त्यांच्यामध्ये लसीकरणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत" असं रावत यांनी म्हटलं आहे.
रावत यांनी यावेळी सामाजिक संस्थांनी आणि सोशल मीडियाने मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहनही केलं आहे. "तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही. लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरू शकते. सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो. देशातील 80 टक्के लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड इम्युनिटी निर्माण होईल" असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संतापजनक! वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण; 'जय श्री राम' बोलण्याची केली जबरदस्ती, Video व्हायरल
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हि़डीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.
गाझियाबाद जिल्ह्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे. अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आपल्या धर्मामुळेच तरुणांनी आपल्याला लक्ष्य केले असा आरोप त्यांनी केला आहे. अतुल कुमार सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मिळाली. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता."