नवी दिल्ली - ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देशभरात 15 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 40 लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली. 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनविलेली कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. 12 वर्षे वयावरील मुलांना कोवॅक्सिन लस देण्यासाठी औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला 24 डिसेंबर रोजी सशर्त परवानगी दिली होती. देशात या वयोगटातील सुमारे 10 कोटी मुले आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोना लसीकरणाच्या बाबतीत पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. देशातील मुलांना आता कोरोना लसीचा डोस दिला जात असतानाच भोंगळ कारभार उघड झाला आहे. दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्य़ाचा धक्कादायक प्रकार बिहारमधील नालंदा येथे घडला आहे. बिहारशरीफ येथील प्रोफेसर कॉलनी येथे ही दोन्ही मुलं राहतात. दोघेही सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नालंदा आरोग्य विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या लसीकरण केंद्राच्या आयएमए हॉलमध्ये पोहोचले होते. येथे दोघांचंही लसीकरण करण्यात आलं.
लस दिल्यानंतर आता पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलाला आणि त्याच्या भावाला कोवॅक्सीन ऐवजी कोविशिल्ड दिल्याचं समजलं. याबद्दल विचारले असता ऑपरेटरने Covishield घेतल्याने कोणतीही अडचण येणार नाही असं उत्तर दिलं. या मुलांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना लस दिल्यानंतर ते सीएस कार्यालयात गेले असता त्यांना दीड तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि काही अडचण आल्यास वैद्यकीय पथक त्यांच्या घरी जाईल असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. लस दिल्यानंतर आता पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आपल्या मुलांना काही होणार तर नाही ना? याची त्यांना भीती वाटते.
सर्टिफिकेटवर कोवॅक्सीन दिल्याचा उल्लेख
वडिलांनी सांगितलं की, एकीकडे लस देताना निष्काळजीपणा केला जात आहे तर दुसरीकडे सर्टिफिकेटवर कोवॅक्सीन दिल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत तक्रार केली असता लस देणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना तेथून हटवण्यात आले. यानंतर पुढे काय कारवाई झाली, याबाबत कोणतीही माहिती नाही. या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉ. सुनील कुमार यांनी याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. लस देणाऱ्या व्यक्तीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. मुलाच्या कुटुंबीयांना धीर दिला आहे. त्यांना आरोग्य विभागाचा क्रमांक देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांच्यासाठी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.