पुणे : पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या ‘एचजीसीओ १९’ या कोरोना लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. ही देशातील पहिली एमआरएनए आधारीत लस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती. अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ही लस विकसीत करण्यात आली आहे. केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने या लसीच्या विकसनासाठी अर्थसहाय्य केले आहे. जिनोव्हा कडून काही दिवसांपुर्वीच चाचण्यांसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने काही अटींच्या आधारे चाचण्यांना मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची अंतरिम माहिती समितीकडे सादर केल्याशिवाय चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे. दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून 'कोविशिल्ड' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. त्यातच पुण्यातीलच ‘जिनोव्हा’च्या ‘एमआरएनए’ आधारीत लसीचीही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याने संपुर्ण जगाचे लक्ष पुण्याने वेधले आहे.
सिरम व फायझरमध्ये स्पर्धा..
भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही परवानगी मागितली असल्याने आता कोणत्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. कोविशिल्ड लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येऊ शकते. तर फायझर लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमान लागते. या लसीसाठी साठवणुक यंत्रणा उभी करणे भारतासाठी सध्यातरी आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडूनही अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.
फायझर या औषध निर्माता कंपनीच्या लसीची परिणामकारकता ९५ टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ब्रिटनसह बहारीनमध्ये या लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. तर अमेरिकेसह भारतात लसीकरणासाठी परवानगी मागण्यात आली आहे. भारतामध्ये परवानगी मागणी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ सिरमनेही औधष महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. कोविशिल्ड लसीची परिणामकारकताही ९० टक्के असल्याचा दावा अॅस्ट्राझेनेका कंपनीने केला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही लसींमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण फायझरसाठी भारतातील लसीकरण आव्हानात्मक ठरणार आहे.